कॅरोल ड्वेक नावाच्या बाईने विकासाच्या (प्रवाही) आणि स्थिर मानसिकतेबद्दल बरंच लेखन केलेलं आहे. याबद्दल थोडक्यात सांगायचं तर, स्थिर मानसिकता असलेल्या लोकांना असं वाटतं, की बुद्धिमत्ता, हुशारी, प्रतिभा या सगळ्या गोष्टी जन्मजात आलेल्या असतात आणि त्याबद्दल आपल्या हातात फारसं काही नसतं. मात्र विकासाची मानसिकता असलेल्या लोकांना वाटतं की परिश्रम घेऊन, झोकून देऊन काम केल्यावर आपण गुण आत्मसात करू शकतो. म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर.
आपल्या शिक्षण पद्धतीत, शिक्षक-पालकांमधे ही विकासाची मानसिकता कधी येईल? आपण मुलांना ‘हुशार’, ‘ढ’, ‘विशेष काही नाही’ अशी लेबलं (विशेषणं) लावून मोकळे होतो. त्यांच्या नैसर्गिक, जन्मजात हुशारीचं कौतुक करतो. याचा परिणाम असा होतो, की ‘हुशार’ गणल्या जाणाऱ्या मुलांना कष्ट करण्याची, नवीन काही शिकण्याची गरज भासेनाशी होते. तर ‘ढ’ ठरविली गेलेली मुलं ‘तसंही आपल्या हातात काहीच नाही’ या भावनेने नाउमेद होतात. त्यापेक्षा मुलांच्या परिश्रमांचं, चिकाटीचं, जिद्दीचं कौतुक करणं जास्त योग्य ठरेल. त्यामुळे ‘शिकत राहणं, स्वत:चा विकास घडवत राहणं हे माझ्या हातात आहे’ अशी भावना वाढीस लागते. शेवटी, मेंदू हा पण एक स्नायू आहे आणि त्याला प्रयत्नपूर्वक बळकट करता येऊ शकतं.
ज्या पिढीवर सगळे स्थिर मानसिकतेचे संस्कार झालेले आहेत आणि वर्षानुवर्षे जे दैवदत्त गोष्टींचं कौतुक करत आलेले आहेत, त्यांच्यासाठी ही विकासाची, प्रवाही मानसिकता स्वीकारणं आणि अंगिकारणं वाटतं तितकं सोपं नाही. पण निदान प्रयत्न तरी केले पाहिजेत!