गेल्या वेळेला मुलांच्या सैनिकीकरणाबद्दल लिहिलं होतं. पण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत फक्त मुलांचंच नाही, तर शिक्षकांचं पण सैनिकीकरण होत आहे. अभ्यासक्रमाची चाकोरी, परीक्षांचं वेळापत्रक आणि त्यानुसार धडे शिकविण्याची बंधनं, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांनी प्रत्येक विषयांचे आणि आठवड्या-महिन्याचे तयार केलेले आराखडे यांच्या दावणीला शिक्षक माणूस बांधलेला असतो. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकविताना गांधी चित्रपट दाखवून त्यावर चर्चा घेण्याएवढं स्वातंत्र्य आणि अवधी शिक्षकांकडे आहे का? चार तासाचा हा चित्रपट शाळेच्या वेळापत्रकात बसणार आहे का? मुलं शाळेत जेव्हा संस्कृत शिकतात किंवा जर्मन, फ्रेंच अशी एखादी परदेशी भाषा शिकतात, तेव्हा त्या भाषेत एखादं छोटंसं नाटक बसवणं किंवा त्या भाषेत एखादा छोटा चित्रपट किंवा व्हिडिओ दाखवण्याएवढी सवड या व्यवस्थेत शिक्षकांना मिळतेय का?
अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं ही मार्गदर्शक म्हणून, संदर्भासाठी असावीत. त्यातला शब्द न् शब्द शिकवून संपविण्याऐवजी विषय समजावून देण्याची, त्याची गोडी लावण्याची, स्वत:ची कल्पकता वापरण्याची मुभा, सवड आणि स्वातंत्र्य शिक्षकांना मिळायला हवं.