पुस्तकात सोडवून दाखविलेल्या उदाहरणांसारखीच गणितं अभ्यास म्हणून किंवा परीक्षेत येतात. त्यात आकडे सोडून काहीच बदल नसतो. समजा, पुस्तकाच्या बाहेरचं गणित असेल, तर त्यात टीप असते. उदाहरणार्थ –
एका सायकलने 3किमी प्रवास केला. जर त्या सायकलच्या चाकाची त्रिज्या 21सेंमी असेल तर 3किमी अंतर कापताना चाकाच्या किती फेऱ्या होतील?
टीप :- चाकाच्या फेऱ्या = सायकलने कापलेले अंतर / चाकाचा परीघ
वेगळं गणित आलंच, तर त्यात अशी टीप का लिहिलेली असते? त्याहीपुढे जाऊन विचारावंसं वाटतं, की गणितामध्ये मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे? मला वाटतं, की गणितं सोडविताना नुसती त्या गणितांची उत्तरं काढणंच नाही, तर एकूणच प्रश्न सोडविण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे. प्रश्नांची उत्तरं स्वत:ची स्वत: विचार करून शोधायला शिकणं हा गणित शिकण्याचा मूळ हेतू आहे. आजकालच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी माहीत असण्याचं महत्त्व पूर्वीइतकं उरलेलं नाही. माहिती तर काय सहज इंटरनेटवर शोधता येते. पण मिळालेल्या माहितीचा वापर करता येणं आणि योग्य तो वापर करून प्रश्न सोडविता येणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. माहिती कुठे आणि कशी वापरायची हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपली मुलं झपाट्याने बदलणाऱ्या जगात मोठी होत आहेत. आज आपण कल्पना करू शकणार नाही, अशा नव्याच समस्या, नव्या प्रश्नांना भविष्यात त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आपण त्यासाठी त्यांना तयार करायला हवं. गणिताचे अभ्यासक्रम आणि उदाहरणं शक्य तितकी सोपी (म्हणजे डोकं न वापरता सोडविण्याची) करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे. अशाने मुलं स्वतंत्र विचार करायला, प्रश्न हाताळायला कशी शिकणार? आणि खोच असलेलं, आव्हानात्मक गणित सोडविण्यातला आनंद वगैरे विचार तर फारच दूर राहिला!
वरच्या उदाहरणातली ‘टीप’ ही मुलांना गणित सोडवायला मदत करण्यासाठी असते. पण दूरगामी विचार केला, तर याने मदत होते आहे की नुकसान?