मुलं जेव्हा निबंध, पत्र किंवा उतारा लिहितात; तेव्हा बहुतेकदा त्यात साधे, सामान्य शब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. उदा. – छान, मजा, चांगला असे. प्रत्येक गोष्ट “छान”, “चांगली” असते. “प्रेक्षणीय”, “अद्वितीय”, “स्वर्गीय” असं काहीच नसतं. असं का? तर बरेचदा असे शब्द माहीत असले तरी लिहायला अवघड वाटतात. त्यात शुद्धलेखनाची काही चूक होईल आणि त्यामुळे आपला अर्धा गुण जाईल, अशी भीती वाटते. मग कशाला उगीच धोका पत्करा, अशा विचाराने मुलं नेहमीचे, सामान्य, तेच ते शब्द वापरत राहतात. इंग्रजीत लिहिताना पण nice, good असेच शब्द वापरले जातात. incredible किंवा fabulous अशा शब्दांपासून मुलं चार हात दूरच राहतात कारण स्पेलिंग चुकण्याची भीती वाटते. शुद्धलेखनात चूक झाली, की गुण कापण्याच्या धोरणामुळे आपण मुलांना वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यापासून, समर्पक, दर्जेदार शब्द वापरण्यापासून परावृत्त करत आहोत.
लिखाणात कल्पकता, विश्लेषण, परिणामकारकता या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत का? शुद्धलेखनाच्या बेड्या घातल्याने या सगळ्या गोष्टींना खीळ बसते आहे का? त्यापेक्षा समृद्ध शब्दसंपत्तीसाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे. नवनवीन, परिणामकारक शब्द वापरल्याबद्दल एखादा गुण जास्त द्यावा, त्यात शुद्धलेखनाची चूक असली तरीही. मग शुद्धलेखनाचे काय? ते महत्त्वाचे नाही का? ते पण महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी शुद्धलेखनाची अशी वेगळी छोटी चाचणी घेता येईल. त्यात फक्त शुद्धलेखन तपासायचे. निबंध, पत्र, कथा अशा लिखाणाशी शुद्धलेखनाची सांगड घालायची गरज नाही.