Tag Archives: शैक्षणिक साहित्य

डिजिटाइझ्ड साहित्य की डिजिटल साहित्य?

तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचं रूपच बदलू लागलं आहे. दर्जेदार शालेय शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी बरेच गट आणि संघटना कार्यरत आहेत. यूट्युब आणि वेगवेगळ्या संकेतस्थळांवर पुष्कळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहेच, परंतु इंटरनेट नसतानाही वापरता येतील असे एकस्टेप आणि कोलिब्रीसारखे नवीन शैक्षणिक प्लॅटफॉर्म (मंच) आता येत आहेत. जिथे इंटरनेट नाही किंवा असलं तरी भरवशाचं नाही, अशा ठिकाणीसुद्धा वर्गांमध्ये आणि वर्गाबाहेर मुलांना तंत्रज्ञान वापरून शिकणं शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात सरकारी आणि अनुदानित मिळून ६८,००० शाळा आहेत. यातल्या सुमारे ४५% शाळांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची तंत्रज्ञानविषयक (उदा. संगणक) सुविधा आहे. तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा सध्या ज्या गतीने वाढत आहेत, तो वेग असाच चांगला राहिला तर लवकरच सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध होतील. खूप आशादायी चित्र आहे हे.

आजकाल महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी स्वत:चा यूट्युब चॅनल किंवा संकेतस्थळ सुरू केल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र शासनातार्फेही लवकरच ‘मित्र’ नावाचं संकेतस्थळ आणि अॅप सुरू होत आहे. यात शिक्षकांना (एकस्टेप प्लॅटफॉर्म वापरून) शैक्षणिक साहित्य बनवता आणि वापरता येणार आहे. अशा नवीन साधनांचा वापर करून आपल्या भाषेत आणि आपल्याशी संबधित असलेलं दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण होणं महत्त्वाचं आहे.

सध्या डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याबाबत खूप उत्सुकता, उत्साह आणि हौस दिसून येते. मात्र बराचसा कल आणि भर हा पाठ्यपुस्तके डिजिटाइझ करण्यावर दिसून येतो. यामुळे तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या संसाधनांचा पुरेसा आणि योग्य वापर होत नाही, असं वाटतं. मुलांकडे पुस्तकं असतातच. आजकाल ही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवरही असतात. तीच गोष्ट फारसा बदल न करता पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? पाठ्यपुस्तकातून होणाऱ्या शिक्षणाला डिजिटल शिक्षणाने जोड द्यायला हवी, भर घालून ते समृद्ध करायला हवं आणि एकूणच शालेय शिक्षणाचा अनुभव व्यापक करायला हवा. उदाहरणार्थ, नाटक आणि चित्रपट ही माध्यमंच वेगळी आहेत आणि त्यामुळे त्यातली निर्मिती प्रक्रियाही वेगळी आहे आणि अर्थातच प्रेक्षकांना मिळणारी अनुभूतीही वेगळी आहे. त्याचप्रमाणे एखादा धडा आपण जेव्हा डिजिटल विश्वात नेतो, तेव्हा त्या माध्यमाची ताकद, क्षमता आपल्याला वापरता यायला हवी. दृकश्राव्यता, संवादात्मकता, आधीच्या क्लिकवर पुढच्या गोष्टी ठरविणे यासारख्या गोष्टींचा उपयोग करून घेता यायला हवा.

Eng-BalBharati

पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातलं संभाषण कौशल्याचं इथे उदाहरण दिलं आहे. मुलांनी संभाषण आणि चित्र अशी जोडी जुळवायची आहे. पुस्तकात असलेलीच वाक्यं आणि चित्रं स्कॅन करून स्क्रीनवर दाखविण्याऐवजी त्याच धर्तीवरची वेगळी वाक्ये देता येतील. उदा. “I’m sorry I broke the cup” सारखी “I’m sorry I broke the glass” किंवा “I’m sorry I spilled milk on the floor” किंवा “I’m sorry I left the tap open” यासारखी संवादकौशल्ये वाढविणारी वाक्यं देता येतील. ही वाक्यं रेकॉर्ड करून ऐकवता येतील आणि मुलांना स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करायची सोयही देता येईल, हे ओघानेच आलं. शिवाय चित्रांवर touch-points (बोट ठेवण्याच्या जागा) तयार करता येतील म्हणजे नळाच्या चित्रावर बोट ठेवल्यास ‘tap’ अशी अक्षरे दिसतील आणि त्याचा उच्चारही ऐकू येईल. भूगोलासारख्या विषयात असे संवादात्मक नकाशे खूप छान होतील. एखाद्या राज्यावर बोट ठेवलं, की त्या राज्याच्या भाषेत वाक्य ऐकू येईल आणि बाजूला त्या राज्याची विशेष माहितीही दिसेल. मुलं विज्ञानातले प्रयोग करताना किंवा गणिताचे प्रकल्प करत असताना त्याचं शूटिंग करून केलेले व्हिडिओ पण खूप उपयोगी आणि मनोरंजक ठरतात.

जितके जास्त लोक अशा शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभागी होतील, तितकं चांगलं. बऱ्याचदा मोजक्या तज्ज्ञांपेक्षा सामान्य लोकांची फौज जास्त कामी येते. त्यातून दृष्टिकोनांचं वैविध्य, वेगवेगळ्या कल्पना आणि निर्मिती-संकल्पना पुढे येत जातात.