Tag Archives: marathi

सैनिकीकरण आणि शिस्त

मला शाळेमधली गणवेषाची पद्धत खरंच आवडते. समता, एकोपा अशा भावना त्यामुळे वाढीस लागतात. अमेरिकेतल्या शाळेत अशी गणवेष घालायची पद्धत नसली तरी इंग्लंडमधे गणवेष असतो. मात्र ही गणवेषाची परंपरा जपताना इंग्लिश लोकांनी बाकी अवडंबराला फाटा दिला आहे. भारतीय शाळांमध्ये मात्र दिवसेंदिवस शिस्त आणि सैनिकीकरण यांतला फरक समजून घेण्याचा अभाव दिसतो आहे. मुलांनी केस कापले आहेत का, मुलींनी दोन वेण्या घातल्या आहेत का याबाबत अतिशय काटेकोर असण्यात कसली आलीय शिस्त? पूर्वी बांगड्या घालणं, मेंदी लावणं या गोष्टींना फक्त कॉन्व्हेंट शाळांमध्येच (का कोणास ठाऊक) मनाई होती. आता हे लोण इतर शाळांमध्येही पसरत चाललं आहे. ज्या गोष्टी इथल्या संस्कृतीचा भाग आहेत, त्या करण्यात कसला आला आहे शिस्तभंग? बऱ्याच (शहरी) शाळांमध्ये आता मुलांना मारणं, छड्या देणं जरी बंद झालेलं असलं तरी मुलांचा पाणउतारा करणाऱ्या, त्यांना खजील करणाऱ्या शिक्षा सर्रास दिल्या जातात.

खरं तर शिस्त लावणं म्हणजे शिकवणं, शिक्षण देणं. खऱ्या शिस्तीचा मार्ग हा स्वयंशिस्तीकडे नेतो. लहान-सहान गोष्टींसाठी कठोर शिक्षा करून ते साध्य होणार नाही.  शिक्षा टाळण्यासाठी तेवढ्यापुरता नियम पाळला जाईल, पण नियम, कायदे पाळण्याची मानसिकता यातून तयार होणार नाही. आपल्या समाजात किती लोकांना कायदे पाळण्यासाठी आहेत असं वाटतं? किती लोकांचा नियमाप्रमाणे काम करण्याबाबत कटाक्ष असतो? यातल्या बहुतेक लोकांना लहान असताना दरडावून, धमकावून, बळाचा वापर करून घरी आणि शाळेत नियम पाळायला लावले होते. शिक्षा होऊ नये म्हणून त्यांनी ते तेव्हा पाळलेही होते. पण त्यांना खरी शिस्त कधी लागलीच नाही. कारण खरी शिस्त आतून, पटली आहे म्हणून येत असते. आजच्या बहुसंख्य नागरिकांनी लहानपणापासून मारून-मुटकून गोष्टी केल्या, आपण पकडलो जाणार नाही ना, याचीच चिंता केली. सदसद्विवेकबुद्धीला प्रमाण मानून वागायचं शिक्षण मिळालं का?

बोर्डाची परीक्षा

Bihar_exam
“द हिंदू” नावाच्या इंग्रजी दैनिकात शेजारील चित्र आणि बिहारमधल्या बोर्डाच्या परीक्षेत पालक, मित्र-आप्तेष्ट कसे मुलांना कॉपी पुरवतात, याची बातमी गेल्याच आठवड्यात वाचली. कॉपी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी यंत्रणेवर पालकांकडून दगडफेक आणि हल्ला होतो आणि “हा गैरप्रकार पूर्णपणे थांबविणे कठीण आहे” असे हतबल उद्गार तिथल्या मंत्र्यांनीच काढले आहेत. हे सगळंच अत्यंत दयनीय आहे.
इतर राज्यांमधलं चित्र इतकं भयानक नसलं, तरी फार काही चांगलं आहे, अशातला भाग नाही. महाराष्ट्रात जवळ-जवळ सगळ्या शाळांमध्ये नववीचं वर्ष निम्मं कसंतरी पूर्ण करतात आणि मग नववीतच दहावीचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होते. दीड वर्षं रट्टा मारून, क्लासेस लावून, पुष्कळ सराव प्रश्नपत्रिका सोडवून आपण जर मुलांना दहावीची बोर्डाची सामान्य परीक्षा द्यायला शिकवत असू, तर या मुलांना पुढचं उच्च शिक्षण कसं झेपणार आहे? शिक्षण किती परीक्षाकेंद्रित करायचं, याचा काही विचार करायला नको का?
पूर्वीचे संगणक फार कमी गोष्टी करू शकत. एकतर बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार अशा गणिती क्रिया करत असत आणि दुसरं म्हणजे पुष्कळ माहिती साठवू शकत असत. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत घासून-घासून आपण आपल्या मुलांचा असा जुन्या काळचा संगणक बनवत आहोत. त्यांना भारंभार माहिती दिलेली असते आणि गणिताच्या आकडेमोडी शिकविलेल्या असतात. इतकी वर्षं त्यांचं विचार करणं, त्यांची निर्मितीक्षमता हे सगळं दुर्लक्षित केल्यानंतर आपण मग ही दहावीची परीक्षा घेतो, आपली यंत्रे नीट चालतात ना ते तपासायला! ही सगळी पद्धत, ही दहावीची एक परीक्षा, त्या परीक्षेचा दर्जा, त्याचं अवास्तव महत्त्व हे सगळंच मूळातून बदलायला हवं. परीक्षेतली कॉपी हा काही मूळ रोग नाही, ते फक्त वर दिसणारं लक्षण आहे.