Tag Archives: practical experience

प्रत्यक्ष अनुभव

अमेरिकेतल्या माझ्या एका मित्राने मला विचारलं, की माझा मुलगा शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काही सामाजिक काम करतो का! वरती तो असंही म्हणाला, की त्याच्या मुलाला १२वी पास होण्यापूर्वी आणि होण्यासाठी (शिक्षणाचा भाग म्हणून) २०० तास सामाजिक काम करावं लागणार आहे. अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांमध्ये तसा नियम आहे.

गेल्या काही दिवसांत अजून एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. निल्सनच्या जागतिक पाहणीत ग्राहक आत्मविश्वासाच्या मोजपट्टीवर भारत सलग सहाव्या तिमाहीत अव्वल क्रमांकावर आहे. गिऱ्हाईक म्हणून आपलं अगदी जोरात चाललंय. भारतातल्या, विशेषतः भारतीय शहरांमधल्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये आता उपभोक्तेपण वाढतं आहे. या आर्थिकदृष्टीने चांगलं चालणाऱ्या कुटुंबांमधली कोट्यवधी मुलं ही महागड्या शाळा-शिकवण्यांमधून शिकत आहेत. या मुलांचा वेळ आणि ऊर्जा चांगल्या कामाकडे वळवून त्यातून त्यांना खरोखरीच उपयोगी पडेल असं काही शिकवायला काय हरकत आहे? अर्थात, काही शाळा किंवा पालक त्यांच्या मुलांना सामाजिक कामाचा अनुभव मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. पण अशी उदाहरणं अपवादात्मक असण्याऐवजी तो शाळेचा/शिक्षणाचा अंगभूत भाग बनायला हवा.

शाळेतल्या (माध्यमिक शाळेच्या) विद्यार्थ्यांनी सामाजिक काम केल्याने सामाजिक संस्थांना आणि एकंदरीतच समाजाला मदत तर होईलच, पण मुलांनाही बरीच व्यावहारिक कौशल्ये शिकायला मिळतील. गटात काम करणं, संवाद साधणं, अडचणी सोडवणं अशी बरीच पाठ्येतर कौशल्ये त्यातून शिकून होतील. सह-अनुभूती, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि जबाबदार नागरिक असणं म्हणजे काय, हे समजू लागेल. शिवाय, प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, ते वेगळंच!

शाळांमधली मुलं बरंच काही करू शकतात. साक्षरतेचं काम, नदी स्वच्छतेचं काम किंवा वृद्धाश्रमात मदत अशा कितीतरी ठिकाणी हातभार लावू शकतात. अर्थातच असे कार्यक्रम सुरू करणं आणि यशस्वीपणे राबवणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण तसं तर सहजासहजी काहीच साध्य होत नसतं!